बालशिक्षण


महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणे चे चंद्रपूर केंद्र आम्ही सप्टेंबर २०१६ ला सुरु केले.
माझ्याकडे या परिषदेच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी आली.




३ महिन्याच्या अल्प काळातही आम्ही बालशिक्षण परिषदेचे २३ वे राज्यस्तरीय अधिवेशन आनंदवन चंद्रपूर येथे घेण्याचे ठरवले.


सुजाण पालकत्वाचा ठाव घेणारे महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेचे चंद्रपूर अधिवेशन     +Harish Sasankar 
महाराष्ट्र बालशिक्षण परिषद पुणे हि संस्था १९९४ पासून बालशिक्षणाचा प्रसार प्रचार करून शास्त्रीय बालशिक्षण घराघरात पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. परिषद दरवर्षी वर्तमान कालानुरूप प्रश्नानुरूप  विषयाधारित वार्षिक अधिवेशन आयोजित करीत असते. यावर्षीचे २३ वे राज्यस्तरीय अधिवेशन बाबा आमटे नगरी आनंदवन येथे ३ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत घेण्यात आले. अधिवेशनातील विषय  व चर्चा भविष्यातील बालशिक्षणातील दिशा दर्शवणारी प्रतीत झाली.
बालशिक्षण परिषदेचे स्वरूप एकूणच नवी उमेद,नवी कार्ये देणारे होते. प्रा.रमेश पानसे या लढवय्या बालशिक्षण चिन्तकाने अख्खी हयात या क्षेत्रातील बदल व गरज समाज व शासनाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. पुढे समाज प्रबोधन करणारी मिशनरी पिढी निर्माण व्हावी हाही या अधिवेशनाचा एक हेतू होता.
आजच्या काळात आपले बालकांच्या शिक्षणाकडेच लक्ष नाही पालक तर सोडाच. मुलाना शाळेत घातले कि तो शिकेलच अशी सर्व साधारण भावना आहे आणि मग जेवढ्या मोठ्या व नावाजलेल्या शाळेत घातले तेवढे चांगले शिक्षण मिळते असे समजून मग त्यासाठी अनावश्यक  स्पर्धा व पैसा खर्च सुरु. एवढे करूनही चांगल्या शिक्षण व संस्काराची हमी कमीच. काय करता येईल सध्याच्या काळात सर्वांनाच पडलेल्या या गहन प्रश्नावर. या परिषदेत एक उपाय आढळला, तो म्हणजे पालकांना सुजाण पालकत्वासाठी जागृत करणे. त्यासाठी त्यांचे वारंवार प्रबोधन करणे. बालशिक्षणातील  इष्ट अनिष्ट काय ते समजावून देणे यावर विविध सत्रात बरेच मंथन झाले.   
        दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यक्रमाचे वेळापत्रक तंतोतंत पाळल्या गेले. सहभागींनी या वेळापत्रकाचे मोठे कौतुक केले. त्यांचा थोडासाही वेळ वाया गेला नाही, संपूर्ण ३ दिवस मन व मेंदू सशक्त करण्याचे व आनंदवनाच्या साक्षीने स्वतःला समाजाभिमुख बनविण्याचे tonic त्यांना घेता आले.
        बीजभाषण या सत्रात अश्विनी गोडसे,पुणे यांनी बालशिक्षणाची व परिषदेची भूमिका समर्पकपणे मांडली. बालशिक्षण शास्त्रीय आहे का, शास्त्र आणि व्यवहार याची सांगड घालतांना कुठे कुठे उणीवा जाणवतात, बालशिक्षण अधिक शास्त्रशुद्ध आणि वापरायला सोपे कसे करता येईल, बालशिक्षणाचे कालचे व आजचे स्वरूप, शास्त्रीय बालशिक्षण कशाला म्हणावे व कशाला नाही, बालशिक्षणात शास्त्रीय दृष्टीकोन कसे रुजवावे, बालशिक्षणातील कार्यकर्त्यांची भूमिका इत्यादी सहविषयावर सविस्तर विषयमांडणी केली.
        शोधनिबंध सादरीकरण हा प्रकार विदर्भातील आम्हा लोकांसाठी एकूणच नवीन होता. एखाद्या विषयाचे अगदी वर्षभर अध्ययन करून, विविध प्रयोग करून, निष्कर्ष काढून ते इतरांसमोर मांडणे, त्यावर साधकबाधक चर्चा करणे, प्रश्नोत्तरे, तत्वे तपासून पाहणे यामुळे प्रत्येकाचे स्वतंत्र वैचारिक अधिष्टान तयार होते. मोठ्याशा क्षेत्रातून छोटासा भाग निवडून त्यावर चिंतन, मनन व  अभ्यासाची सवय जडते. परिषदेत त्यासाठीच राज्यभरातून १३ अभ्यासक आपले शोधनिबंध घेवून आले. ज्यांचे शोधनिबंध वाचनासाठी निवडता नाही आले त्याचे “संक्षेप शोधनिबंध सादरीकरण” या सत्रात वाचन झाले.
अधिवेशनात जवळपास सर्वच विषयाला हात घालण्याचा प्रयत्न झाला. अधेमध्ये राज्यातील नामवंत शिक्षणतज्ज्ञाचे मार्गदर्शनपर भाषणे फ्रेश करत होती.
        खुले अधिवेशन हे अधिवेशनातील विशेष सत्र. दोन दिवसाच्या मंथना नंतर काय आहेत आपल्या मनातील भावना, प्रश्ने यावर प्रा.पानसे सर व अन्य मान्यवरांनी दिलखुलास उत्तरे दिली. यात एका अंगणवाडी ताईने धीटपणे मांडलेल्या समस्या ज्यातून असे जाणवले की शासनाचे बालशिक्षणाकडे सध्या अक्षम्य दुर्लक्ष होत आहे, शिकवणाऱ्या कडे, पिढी घडवणाऱ्याकडे विनाकारणची कामे लावून ठेवली आहे. हि बाब चिंतन करायला भाग पाडत होती. बीजभाषणातील एका शब्दावर स्पस्टीकरण मागण्यास एक माध्यमिक वर्गाला शिकवणारी भगिनी पुढे आली. विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शाळेतील शिक्षक त्यांच्या समस्या मांडू लागले. पानसे सर, नेहेते सर, बियाणीताई, बोकील सर यांनी मात्र प्रत्येकाचे समाधान होईल या स्तरावर जावून समजावून दिले. हे सत्र आणखी पुढे चालावे, आणखी प्रश्न मांडावे, चर्चेत सहभागी व्हावे असे प्रत्येकाला वाटत होते. अगदी मलाही, काही प्रश्न मनातच राहून गेले कारण वेळ व पुढचे सत्र यांना पुढे जावू द्यायचे नव्हते. मग विश्रांती काळात अनौपचारिक चर्चेत सर्वानी या तज्ज्ञाना घेरून आपले मन मोकळे करून घेतले.
        समारोपीय सत्रात नेहमीसारखी निरवानिरवीची भाषणे नक्कीच नव्हती तर पुढच्या कामाची दिशा दाखवणारी उमेद होती, मार्ग दाखवणाऱ्या वाटा व तिथपर्यत पोहोचवणारे वाटाडे होते. प्रत्येकाला बालशिक्षणात आता पुढे काय काम करायचे आहे याची शिदोरी या अखेरच्या सत्रात मिळाली. उपस्थितांचा उत्साह व या क्षेत्रात काम करण्याची, त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळवून मार्गक्रमण करण्याची जिज्ञासा पाहून मार्गदर्शकही आनंदित झाले.       
        “बालशिक्षण राष्ट्र घडवणीसाठी आवश्यक आहे. मात्र राज्यकर्ते, अधिकारी यांच्याकडे या कामासाठी शून्य वेळ आहे.” या पानसे सरांच्या शब्दाने सर्व बालशिक्षणप्रेमी भानावर आले. कारण या दोन घटकांना सोडून सर्वांना पुढे काम करायचे होते. “मित्रांनो, बालशिक्षण वाचवण्याची व समृद्ध करण्याची जबाबदारी तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या खांद्यावर घ्यावी असे मला वाटते.” या वाक्याने प्रत्येकाला आपले कार्य समजले होते. हेच या अधिवेशनाचे वैशिष्ट होते.
        यशस्वी शिक्षणाचे निकष सांगतांना त्यांनी शिक्षण क्षेत्रात कॉलेज वयाची संख्या किती त्याआधी किती मुले शाळेत दाखल झाली होती हे प्रमाण अन्य देशांत २५ ते ३० टक्के आहे तेच आपल्या देशात फक्त ७ ते १० टक्के आहे. हे प्रमाण प्रत्येकाला चिंतन करायला भाग पडणारे आहे. ज्या देशात बालशिक्षणावर जास्त खर्च होतो तेथे तुरुंगातील संख्या कमी होते, त्यावरचा खर्च वाचतो. म्हणून बालशिक्षण महत्वाचे न वाटणारा देश कधी महान होवू शकत नाही. हे झणझणीत सत्य जेव्हा सरांनी सांगितले सर्वांनी या क्षेत्राकडे पाहण्याची दृष्टी नव्याने तयार करणे किती गरजेचे आहे हे सत्य उमजले.
        या राज्यस्तरीय परिषदेला महाराष्ट्र व गोवा या राज्यातील ४०० प्रतिनिधी पूर्णवेळ उपस्थित होते. असा प्रचंड जोश व प्रेरणा देणारे हे अधिवेशन कधी संपले हेही समजले नाही ते फक्त तीनच दिवस का होते ? असा प्रश्न माझ्यासह सर्वांच्या मनात निर्माण झाला.                                                                                                                      @  हरीश ससनकर,  
          लेखक, चंद्रपूर येथे प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत तसेच लेखक समीक्षक व सामाजिक कार्यकर्ते आहेत.

                                                               ९३७०५९०३९४  mbspchandrapur@gmail.com






Comments

Popular posts from this blog